'ही' पुण्याची खरी संस्कृती! काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 02:19 PM2020-12-28T14:19:55+5:302020-12-28T14:31:56+5:30
प्रेम नसेल तर नसू द्या पण वैर नको; ही पुण्याची खरी संस्कृती! काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी..
पुणे: काँग्रेसच्या १३५ वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांंनी पक्षाच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सोमवारी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली. प्रेम नसले तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
खासदार बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपा नगरसेवक, कार्यकर्ते यांचा भला मोठा ताफाच काँग्रेस भवनमध्ये हजर झाला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांंनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर हास्यविनोदाची मैफलच बापट व बागवे यांनी जमवली. त्यांना बीडकर, मोहोळ व काँग्रेसकडून अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर वगैरे मंडळींनी साथ दिली.
बापट म्हणाले.; पक्ष कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. ते करताना मतभेद होतातच, पण ते वैचारिक असावेत. पुण्यात हे नेहमी पाळले जाते. तीच पुण्याची संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी आपण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो ते असेच कायम राहिले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाणयांचीही प्रत्यक्ष काँग्रेसभवनाला भेट ....
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी देखील काँग्रेसभवनाला दाखल झाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.