लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या निराधार मुलांचा काही विश्वस्त संस्था आधार होत आहेत. या मुलांच्या राहाण्या-जेवण्यासह शिक्षणाचीही जबाबदारी या संस्था घेत आहेत.
पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी यासाठी त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या संस्थांना आवाहन केले होते. त्याला अनेक संस्थाचालकांनी प्रतिसाद दिला आहे.
कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बुक्के यांनी चार संस्थांकडे चार मुले सुपूर्तही केली आहेत. पुण्यासह नगर, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यांत प्रायोगिक स्तरावर म्हणून आवाहन केले होते. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असे बुक्के यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यांमधील कार्यालयांना तसेच सामाजिक संस्थांना कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ५ मुलांची नावे आली आहेत, त्यात दोन मुलीही आहेत. आई किंवा वडिलांकडचे नातेवाईक राहिलेत, पण त्यांची आर्थिक स्थिती नाही अशा मुलांचा समावेशही यात करण्यात येत असल्याची माहिती बुक्के यांनी दिली.
काही शैक्षणिक संस्थांसह देवस्थान, तसेच सामाजिक संस्थांनीही अशा मुलांची जबाबदारी स्वीकारण्यास संमती दिली आहे. या मुलांचा सज्ञान होईपर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. यात कायदेशीर गोष्टींची पूर्तताही केली जाते. मुले त्यांच्यावर सोपवली व जबाबदारी संपली असे होणार नाही. त्या मुलांच्या निगराणीकडे सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे लक्ष राहील असे बुक्के म्हणाले. वरील चारही जिल्ह्यांतील निराधार, अनाथ मुलांच्या नातेवाईकांनी सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.