पुणे : तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. स्वत:ची तुलना इतरांशी कधीही करू नका. तुम्ही आज तुमचा वेळ व उर्जा कोठे खर्च करता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. तुम्ही जर तुमचा वेळ सकारात्मक गोष्टींवर खर्च केला तर त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल, असे मत पॉंडेचरीच्या राज्यपाल डॉ किरण बेदी यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘चिकाटी- माझ्या आयुष्यातील घटना’ या विषयावर त्या बोलत होत्या. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ विद्या येरवडेकर यावेळी उपस्थित होते.
बेदी म्हणाल्या की, सर्वांनी दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक विचारांनी करावी. आपोआप फरक कळेल. तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला आनंद वाटला पाहिजे त्यात येणा-या समस्या या तुम्हाला संधी म्हणून सोडवता आल्या पाहिजेत. यासाठी कायम स्वत:बद्दल खात्री बाळगा. आपला आत्मविश्वास वाढवा.
डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले. सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टसच्या संचालिका डॉ. अनिता पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.