पुणे : प्रचंड भूक लागलीय; पण वरणभात, पोळीभाजी खात बसायला वेळ नाही, भूक तर भागली पाहिजे व वेळपण कमी लागायला हवाय. म्हणजे पोट पुरेपूर भरायला पाहिजे. अशावेळी करायचं काय? पंजाब हे त्यावरचे उत्तर आहे. म्हणजे काय तर कोणताही पंजाबी पदार्थ खा. कमी वेळात पोट जास्त भरायची हा एक हमखास उपाय आहे. छोले भटुरे हा त्यातला एक सर्वोत्तम उपाय आहे.
असे करायचे छोले
छोले म्हणजे काबुली चणा. थोडा पिवळट पांढरा असलेला. तो रात्री भिजवलेला असेल तर उत्तम. मग हा पदार्थ करायलाही वेळ लागत नाही. कुकरमध्ये छोले छान उकडून घ्यायचे. नंतर दालचिनी, तमालपत्र, लवंग असे मसाल्याचे पदार्थ तेलात चांगले परतून घ्यायचे. त्यात मग आपला नेहमीचा गोडा मसाला, लाल तिखट, टोमॅटो वगैरे टाकायचे. आवड व कौशल्य असेल तर मग चिंचगुळाचा हात याला लावायचा. त्यात छोले टाकून सगळे मिश्रण छान उकळू द्यायचे.
भटुरे म्हणजे मोठी पुरी
भटुरे करायचे तर आधी पुरी करायचा सराव हवा. पुरी गव्हाच्या कणकेची, तर भटुरे मैद्याचे. मैदा चांगला मळून घ्यावा लागतो. मळतानाच त्यात थोडे दही टाकायचे. म्हणजे भटुरे चवीला चांगले लागतात. पुरीपेक्षा थोडा मोठा आकार लाटून घ्यायचा. तो तेलात पूर्ण सोडावा लागतो. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. तेलात तो बुडाला असतानाच झाऱ्याने थोडा दाबावा लागतो, म्हणजे मग त्याला चांगला फुगवटा येतो. फुगलेला असतानाच तो बाहेर काढायचा.
..अशी येते समोर डिश
एका वाटीत छोल्यांची भाजी, जोडीला दोन चांगले टम्म फुगलेले भटुरे, बरोबर हवे असेल तर लोणचे किंवा मग सॉस, एखादी चटणी, काद्यांच्या चार-दोन चकत्या. असा सगळा गरमागरम असलेला साज पुढे आला की थांबता थांबवत नाही. तिखटाबरोबरच मधूनच चिंचगुळाची गोडसर चव लागते व जिभेवर बहार येते. भटुरेचा एक तुकडा व त्याबरोबर थोडेसे छोले. दोन भटुरे व छोले शब्दश: दहा-पंधरा मिनिटात उदरस्थ होतात व त्याचवेळी पोट भरल्याचा फिल येतो.
कुठे खाल- दर्शन, प्रभात रस्ता, त्याशिवाय मग आता बऱ्याच हॉटेलमध्ये मिळतात.
कधी- शक्यतो दुपारी भुकेच्या वेळेत.