पुणे : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा वानवडीतील परमारनगरमध्ये असलेल्या एच बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी(दि.१७) दुपारी उघडकीस आली आहे. कांबळे यांच्यासह आणखी दोन फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी वानवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यमंत्री कांबळे यांचा वानवडी परिसरातील परमाननगर येथील एच बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. तो गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होता. चोरट्यांनी कटरच्या मदतीने कांबळे यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कट करून आत प्रवेश केला. परंतु, चोरट्यांच्या हाताला काही एक लागले नाही. कांबळे यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. फ्लॅटनंबर २५७, २५८ आणि २५९ मध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना येथे एच बिल्डींगमध्ये काम करणा-या एका महिलेला समजली. त्यानुसार पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समजली. वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे.
पुण्यात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 7:31 PM
राज्यमंत्री कांबळे यांचा वानवडी परिसरातील परमाननगर येथील एच बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. तो गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होता.
ठळक मुद्देकांबळे यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरीचा प्रयत्न पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू