पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही काही चाललं आहे. पण महाराष्ट्रातील राजकारण काय चालले यापेक्षा जास्त एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकडे आपले अजिबात लक्ष नाहीय. इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष देत आहोत. या गोष्टींनी आपण मरणार नाही. आपल्याला आयुष्याला जो धोका आहे, तो विषय म्हणजे हवामान बदल हा आहे. प्लास्टिक ही समस्या आपल्यासाठी घातक आहे. मी स्वत: बदल घडवून लोकांना सांगते आहे, अशा भावना अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने व्यक्त केल्या आहेत. रोज आपणच दिवसभरात किती कचरा जमा करतो, त्याचा एक्सरसाइज करावा, असे आवाहनही तिने केले आहे.
नुकताच मी एक माहितीपट पाहिला. त्यात एक आयलंड आहे. तिथे माणूस पोचलेला नाही, पण तिथे प्लास्टिक पोचले आहे. ही किती भयानक गोष्ट आहे. हे आपणच घडवून आणत आहोत. त्यामुळे पक्षी, प्राणी, निसर्गाला याचा धोका आहे. प्राणी, पक्ष्यांच्या अन्नात प्लास्टिक मिसळत आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य संपत आहे. मी खरेदी करताना अनेक दुकानात गेले. तेव्हा तिथे पाणी दिले जाते. ते सरळ प्लास्टिकची बाटली देतात. त्याऐवजी पिंप ठेवला, स्टीलचे ग्लास ठेवले तर उत्तम होईल. त्यातून उत्तम नागरिक म्हणून तुम्ही योग्य ठराल. आपण जर घराबाहेर जात असू, तर स्टीलची बाटली सोबत ठेवावी. ती संपली तर कुठेही भरून घेता येईल. त्यामुळे प्लास्टिक बाटली विकत न घेता असा पर्याय निवडावा. सहज उपलब्ध होते, म्हणून प्लास्टिक बाटली घेऊ नका. आता आपल्याला याचा धोका समजत नाहीय. पर्यावरणाचा ऱ्हास यातून होत आहे. म्हणून थोडं लक्ष देऊन प्लास्टिक वापरणे बंद करायला हवे. किमान कमी कसे करता येईल, ते पाहूया.
नदी पात्रात देखील खूप प्लास्टिकचा कचरा टाकला जातो. त्याने नदीला पुराचा धोका निर्माण होतो. हा कचरा कोण टाकतो ? तर नागरिकच टाकतात. आपल्यातीलच काही माणसं हे करत आहेत. त्यांनी जरा यावर आळा घालायला हवा. मी माझ्या घरात खूप कचरा तयारच करणार नाही, असा प्रण करूया.
एक टास्क प्रत्येकाने करावा. सकाळी उठल्यावर एक बादली घ्या आणि त्यात दिवसभरात किती प्लास्टिक जमा होते, ते त्यात टाका. मग पहा किती दिवसभरात प्लास्टिक जमा करत आहोत. त्यावरू अंदाज करा की, असा कचरा प्रत्येक घरात किती तयार होत असेल आणि त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. हा एक्सरसाइज तुम्ही नक्की करा, असे माझे आवाहन आहे.
- गौतमी देशपांडे, अभिनेत्री