विद्यापीठाकडे उपलब्ध असलेली जागा आता कमी पडत चालली आहे. त्यामुळे विद्यापीठापासून जवळ काही अंतरावर दुसऱ्या कॅम्पसची निर्मिती (सॅटेलाईट कॅम्पस) करण्याची आवश्यकता आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील जागेच्या प्रस्तावासह इतर ठिकाणची जागा मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून पुढील काळात प्रयत्न केले जातील, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. नितीन करमळकर यांनी प्रथमच लोकमत कार्यालयाला भेट दिली. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी करमळकर यांचे स्वागत केले. या प्रसंगी विद्यापीठाच्या व्हिजनविषयी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. कुलगुरू निवडीसाठी नियुक्त केलेल्या समितीसमोर मी १० ते १२ मुद्द्यांच्या आधारे विद्यापीठाचे व्हिजन सादर केले होते. हेच व्हिजन पुढील पाच वर्षांत प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करणार असल्यचे त्यांनी सांगितले. करमळकर म्हणाले, की परदेशात इंटरनल क्वॉलिटी अॅशुरन्स कमिटीचे (आयक्यूएसी सेल) विद्यापीठाच्या कामकाजावर बारीक लक्ष असते. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार पारदर्शकपणे चालतो व विद्यापीठाच्या विकासाला योग्य गती मिळते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह विद्यापीठातील अधिकारी एखाद्या गोष्टीत निर्णय घेण्यात चुकत असतील, तर आयक्यूएसी सेलला ही चूक दाखवून देता आली पाहिजे. त्यासाठी आयक्यूएसी सेलला अधिक सक्षम केले जाणार आहे.नीतिमूल्यांची जपणूक करणे, विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याबरोबरच प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्याने घेतलेले शिक्षण हे त्याच्या उपजीविकेसाठी उपयुक्त पडले पाहिजे यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक बदल केले जातील. शिक्षणक्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला विद्यापीठाशी जोडण्याचा प्रयत्न करून कालबाह्य अभ्यासक्रम बदलून औद्योगिक कंपन्या किंवा रोजगारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्ये प्राप्त व्हावीत, या दृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जातील. ४नवीन विद्यापीठ कायद्यामुळे कुलगुरूंना अनेक अधिकार प्राप्त झाले आहेत. तसेच, कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण अधिष्ठाता व इतर पदाधिकारी नियुक्त करणे शक्य झाले आहे. विनाकारण केल्या जाणाऱ्या राजकारणाला त्यामुळे आळा बसेल. पूर्णवेळ चार अधिष्ठाता व उप-कुलगुरूंची नियुक्ती होणार असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येईल. त्यामुळे नवीन कायद्याच्या माध्यमातून विद्यापीठाला अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.४विद्यार्थी निवडणुका शांततेत व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा वापरण्याचा विचार आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या मदतीने कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय निवडणुका घेतल्या जातील.विद्यार्थी मानांकित करण्यावर भर४विद्यापीठांचे जागतिक स्तरावरील मानांकन वरवरची माहिती घेऊन दिले जाते. केवळ विद्यापीठाची काही आकडेवारी विचारात घेऊन मानांकन केले जाते. विद्यापीठाची प्रत्यक्ष पहाणी केली जात नाही; त्यामुळे या मानांकनाला फारसे महत्त्व नाही. विद्यापीठाचे विद्यार्थी मानांकित होत नाहीत, तोपर्यंत विद्यापीठाच्या मानांकनाचा उपयोग नाही. त्यामुळे विद्यार्थी मानांकित करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी जागतिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण विद्यापीठाशी करार करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्याचा प्राध्यापक व विद्यार्थ्यांनाही फायदा होऊ शकेल.भवन बांधल्याने भाषा वाढत नाही ४काही वर्षांपासून भाषा भवन बांधण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ भवन बांधल्याने भाषा वाढत नाही. विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून चांगले काम केले जाते. त्यामुळे मराठी भाषेतून निर्माण झालेल्या विविध साहित्याचा उपयोग इतर क्षेत्रात करण्याबाबत विचार केला जाईल. विद्यापीठाच्या परिसरातील सर्व संस्थांचा विद्यापीठाशी संवाद वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यातून विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल.४विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घेतले जाईल. विद्यापीठाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन विविध उपक्रम राबविले जातील. विद्यापीठाने काय करावे, हे समाजातील घटकांकडून जाणून घेतले जाईल. तसेच, त्यादृष्टीने आवश्यक पाऊल उचलले जाईल. ४विद्यार्थ्यांना माहितीची नाही, तर ज्ञानाची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना विविध विषयांतील अत्याधुनिक ज्ञान देण्यासाठी विद्यापीठाकडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. रुसाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या साह्याने अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आला आहे. तसेच, तज्ज्ञ प्राध्यापकांचे लेक्चर रेकॉर्ड केले जात आहे. शिक्षणाबरोबरच संशोधन महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर दिला जाईल. तसेच, विद्यापीठाचे विद्यार्थी हे रोजगार शोधणारे नाही, तर रोजगार देणारे झाले पाहिजेत. त्यासाठी उद्योजकता विकासवाढीस लागणे गरजेचे आहे. इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उद्योगांना चालना दिली जाईल.
विद्यापीठाच्या सॅटेलाईट कॅम्पससाठी प्रयत्न
By admin | Published: May 25, 2017 2:45 AM