निमोणे : सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरामधील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, मोटेवाडी, लंघेवाडी, गुनाट, शिंदोडी, निर्वी, चिंचणी या भागामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीची जखम ताजी असताना चालू वर्षीसुद्धा हा बाजारभाव शेतकऱ्यांचे ‘पानिपत’ करत आहे. चालू वर्षीही भाव नाही. साठवायचा तर, गतवर्षी सडलेल्या, उकिरड्यावर फेकलेल्या कांद्याचा वास अद्यापही गेलेला नाही. गतवर्षी कांद्याने शेतकऱ्यांची मोठी दैना केली. उत्पादन भरपूर निघाले पण बाजार ‘डाऊन.’ सोन्यासारखा माल कवडीमोल भावाने विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बहुतांश शेतकऱ्यांनी ह्यया बाजारभावात कांदा विकूनही साधी मजुरीही भागात नाहीह्ण म्हणून कांदा साठवणे पसंत केले. त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीचा कटू अनुभव असल्याने यावर्षी कांदा ठेवण्याचा कोणताच शेतकरी विचार करत नाही. पुणे, नगर या ठिकाणी बाजारभाव नाहीत. दोन पैसे जरा बऱ्यापैकी मिळतील या आशेने येथील शेतकरी सोलापूर, कोल्हापूर अशा लांबच्या बाजारपेठा गाठत आहे. मात्र ह्यसब घोडे बारा टक्केह्ण असाच अनुभव त्याला सर्वत्र येत आहे. उलट वाहतूक खर्च वाढतो व अधिक तोटा होतो. मात्र हा तोटा सहन करून शेतकरी कांदा मात्र घरी न ठेवता विक्रीसाठीच पाठवत आहे.
उत्पादनखर्च भागविण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 21, 2017 5:02 AM