लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : मुलीने भजी करून दिले नाही यावरून चिडून जाऊन मुलीला जीवे मारण्याच्या प्रयत्न वडिलांनी केला आहे. ही घटना खरपुडी (ता. खेड) येथे घडली. या घटनेत १९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पत्नी निर्मला राजाराम गायकवाड (वय ३९, रा. खरपुडी) यांनी खेड पोलिस ठाण्यात पती विराेधात तक्रार दिली आहे.
राजाराम दगडू गायकवाड (रा. खरपुडी) असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलांचे नाव असून तो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांच्या राहत्या घरात वडील राजाराम गायकवाड याने १९ वर्षीय मुलीला भजी करण्यास सांगितले होते. मात्र, घरात तेल नसल्याने तिने वडिलांना भजी करून दिली नाहीत. त्याचा रा. मनात धरून राजाराम गायकवाड यांनी मुलीच्या डोक्यावर वीट मारली. तसेच काठीने दोन्ही हातावर व बोटांवर मारून तिला गंभीर जखमी केले. घटनेनंतर फरारी झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सचिन गिलबिले करत आहे.