पुणे : प्रेमाला नकार दिल्यानंतर, एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्यासाठी विषारी इंजेक्शन टोचण्याचाही प्रयत्न केला गेला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.सागर कुमार अलकुंटे (वय २६, रा. शंकरमहाराज मठाजवळ, हडपसर), सौरभ किरण जगताप (वय २२, रा. गोखलेनगर) आणि टिनू मॅथ्यू (वय २०, रा. काळेबोराटेनगर, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २० वर्षीय पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित विद्यार्थिनी ही एका नामांकित महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते, तर सौरभ जगताप हा शिक्षण घेत असून, टिनू मॅथ्यू हा वेब डिझायनर आहे, तर आरोपी सागर अलकुंटे हा रोड कॉन्ट्रक्टर असून, त्याने तिला तिच्याच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगून ओळख वाढवली; मात्र तो महाविद्यालयात शिक्षण घेत नसल्याचे विद्यार्थिनीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने सागरला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने तिला त्रास देण्यात सुरुवात करून, तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांना अटक करून, रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ टोळक्याने तरुणीला फरफटत नेऊन तिला मारहाण केली आहे. तसेच, विषारी इंजेक्शनही टोचण्याचा प्रयत्न केला. त्याने विषारी इंजेक्शन कोठून आणले, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करायचा आहे. इतर साथीदारांचाही शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकील आर. आर. पाटील यांनी तिघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले करीत आहेत. (प्रतिनिधी)हात-पाय बांधून चाकूने केले वार४गुरुवारी महाविद्यालयातून ती मैत्रिणीसह घरी जात असताना, सागर याने तिला ढकलून दिले. नंतर हाताने मारहाण करून, तिच्या डाव्या हातास धरून फरफटत नेल्याने तिच्या पायाला आणि कंबरेला जखम झाली. तिला जिवे मारण्यासाठी त्याने सोबत आणलेल्या इंजेक्शनमधून विषारी औषध देण्याचा प्रयत्न केला. तसेच, चाकूनेही तिच्या खुनाचा प्रयत्न केला. तिच्या बरोबर असलेली तिची मैत्रीण आणि तिचा भाऊ यालादेखील मारहाण केली.
तरुणीला जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 10, 2016 2:00 AM