देहूगाव : महिला आणि पुरुष समानतेसाठीच्या संघर्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जातो. संघर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती आणि राज्यघटना यामुळे यश मिळाले आहे. महिलांनी आमच्या पुढे जाऊ नये यासाठीच धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी काही प्रथा व नियम केले आहेत, असे मत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूगावच्या माळीनगर येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देसाई बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब जांभूळकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला काळोखे, सचिन विधाटे, पूनम काळोखे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश हगवणे, प्रकाश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मावळ तालुका उपाध्यक्षा वैशाली टिळेकर, ज्योती रोहिदास टिळेकर आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच ज्योती टिळेकर यांचा या वेळी नागरी सत्कार करण्यात आला. रवींद्र जांभूळकर यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळशी तालुक्यातील लवळे येथील सर्जेराव खेडकर यांचाही या वेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. माळीनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले होते. सुरेश कुरपे यांनी प्रास्ताविक केले. शेखर परंडवाल यांनी सूत्रसंचालन केले. सुनील विधाटे, अशोक परंडवाल यांनी परिश्रम घेतलेआपल्या देशात स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. समाजात प्रत्येकाला आई, बहीण व बायको हवी मात्र मुलगी नको असते. मुलगा आणि मुलगी दोघेही आपले वारसदार आहेत. त्यांना आपल्या घरापासूनच समानतेची शिकवण दिली पाहिजे. समाजाने मुलींच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, वेळप्रसंगी महिलांनी व मुलींनी आक्रमक होऊन दुर्गेचे रूप घेतले पाहिजे तरच अन्याय दूर होतील.- तृप्ती देसाई, प्रमुख, भूमाता ब्रिगेडदेशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी सामान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. महिला जगल्या तरच समाज जगणार आहे. महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी लढले पाहिजे. मानसिकता बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलली जाणार नाही. याच देशात ‘बेटी बचाव’ कार्यक्रम करावे लागत आहेत. समाजाची नेमकी समस्या समजली पाहिजे, त्याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. स्त्रीयांच्या संरक्षणाची गरज आहे. यासाठी मुलींनी व महिलांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. - प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड