इंदापूर : कोरोनामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारने तर खासदारांना मिळणाऱ्या हक्काच्या फंडाला कात्री लावली आहे. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही विकासकामांचा निधी थांबवला नाही. त्यामुळे झपाट्याने कायापालट होताना दिसत असल्याचे सांगत तालुक्यातील एमआडीसीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार निमगाव केतकी येथे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सात जिल्हा परिषद मतदारसंघात, तसेच इंदापूर शहर येथे ऑनलाइन पद्धतीने कामांचे उद्घाटन केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे हे ऑनलाइन जोडले होते. तर महिला तालुका अध्यक्ष छाया पडसळकर, कार्याध्यक्ष अतुल झगडे, तात्यासाहेब वडापुरे, मच्छिंद्र चांदणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक घटक पक्षांना आपला हक्काचा मंत्री म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जवळचे वाटतात. राज्याच्या मंत्रालयात सर्वाधिक गर्दी राज्यमंत्री भरणे यांच्या केबिनला असते. राज्यामध्ये पहिले चार मंत्री जे चांगले काम करतात, त्यामध्ये भरणे यांचा नंबर लागतो असे सांगत त्या म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळावे. दत्तात्रय भरणे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अवघ्या ५० लोकांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन उद्घाटन समारंभ होत आहे. लाकडी-लिंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न, दळणवळणाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुटत आहे. तालुक्यात असणाऱ्या एमआयडीसीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून, नवे उद्योग व अद्यावत सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
२७ इंदापूर भरणे
विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.