पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान कक्ष सुरू करण्यात आला असून नव्या शोध मोहीम अभियानाचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य विधी अधिकारी मंजूषा इधाटे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक, क्षयरोग अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कर्मचारी, एनजीओ स्वयंसेवक उपस्थित होते.
कोरोनामुळे कुष्ठरोगी व क्षय रुग्णांचर निदान व औषधोपचार करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना त्रास होण्यासोबतच सहवासातील निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. संसर्गाची साखळी तुटत नाही.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील झोपडपट्टी, बांधकाम ठिकाणे, मजुर अड्डे, स्थलांतरीत लोकसंख्या इ. जोखमीच्या भागांमध्ये क्षयरुग्णांचे व कुष्ठरुग्णांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. त्यांना तातडीने उपचार देण्याकरिता संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.
चौकट
सर्वेक्षणांमध्ये स्वयंसेवक घरोघरी जावून लक्षणांच्या आधारे संशयित रुग्णांचे निदान करण्यासाठी आरोग्य केंद्रात नेतील. निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. अदयापपर्यंत निदानापासून वंचित असलेल्या सर्व रुग्णांना शोधुन त्यांच्यावर औषधोपचार सुरु करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश आहे.