Pune: काँग्रेसमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच; लोकसभा मतदारसंघावरून पक्षश्रेष्ठींपुढेही पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:16 PM2024-03-02T13:16:30+5:302024-03-02T13:17:17+5:30
पक्षाच्या शहर शाखेने प्रदेश समितीकडे या दोघांसह अन्य १८ जणांची यादी पाठवली आहे...
पुणे : पुण्यातील लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. यात आमदार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे, तर प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनीही उमेदवारीसाठी तयारी चालवली आहे. पक्षाच्या शहर शाखेने प्रदेश समितीकडे या दोघांसह अन्य १८ जणांची यादी पाठवली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्व ताकद पणाला लावलेली असतानाही, सलग २८ वर्षे या मतदारसंघावर भाजपची मक्तेदारी असतानाही धंगेकर यांनी येथून विजय खेचून आणला. तब्बल ११ हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांचे नाव काँग्रेसमध्ये थेट वरिष्ठ स्तरावर गेले आहे.
केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक काळात या मतदारसंघात मुक्काम ठोकला होता, तरीही भाजपचा पराभव झाल्याने या निवडणुकीची, पर्यायाने धंगेकर यांची चर्चा देशभर झाली. त्याच बळावर आता ते लोकसभेसाठी दावा करत असल्याची चर्चा आहे. त्यांनी स्वत:ही माध्यमांबरोबर बोलताना आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.
कसबा पोटनिवडणुकीची सगळी मोर्चेबांधणी काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी केली होती. अन्य स्थानिक नेत्यांच्या तुलनेत त्यांनी प्रचारापासून ते बुथ नियोजन करण्यापर्यंत काम केले होते. मतमोजणीच्या दिवशीही ते सकाळपासून मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. धंगेकर यांच्या विजयाचा दावा काँग्रेसमध्ये तेच सुरुवातीपासून करत होते. कसब्याचा समावेश पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आहे. जोशी यांनी याच लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे तेही आता लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत.
काँग्रेसच्या शहर शाखेने प्रदेशकडे दिलेल्या इच्छुकांच्या यादीत आमदार धंगेकर, मोहन जोशी यांच्याशिवाय शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी उपमहापौर आबा बागूल, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड व अन्य काही नावांचा समावेश होता. यातील बरीच नावे जोशी समर्थकांची आहेत, अशी चर्चा आहे.
पक्षाच्या केंद्र व राज्य शाखेतही पुण्याच्या निवडणुकीवरून पेच निर्माण झाला आहे. जोशी अनुभवी आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या निकटचे आहेत. कर्नाटक, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे केंद्रीय नेत्यांचा कल त्यांच्याकडे असल्याचे बोलले जाते, तर धंगेकर तरुण, धडाडीचे आहेत. उमेदवारी दिली तर ते मतदारसंघ पिंजून काढतील असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.