केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे तुकाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या आखाड्यात कुस्त्यांचा थरार हजारो प्रेक्षकांनी अनुभवला. चितपट कुस्त्यांनी हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता सनई-ताशांच्या निनादात आखाडा भीमा नदीतीरावरील मैदानावर विसावला. ३० किलो वजनगटापासून कुस्त्यांना सुरुवात झाली. ३०० रुपये इनामापासून ‘ऐका ओ’या पंचांच्या आरोळीने मैदान परिसर दुमदुमला. अंतिम लढत बंटी रंधवे (काष्टी) विरुद्ध आकाश ताकवणे (पारगाव) व प्रदीप बोत्रे (पारगाव) विरुद्ध संपत जाधव (इंदापूर) यांच्यात रंगतदार झाली. ग्रामस्थांनी दोन्ही कुस्त्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये इनाम दिला. या आखाड्यात एकूण १५० चितपट कुस्त्या झाल्या. विजयी मल्लांना दीड लाख रुपये इनाम वाटण्यात आले. आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी परस्परविरोधात असलेले मातब्बर उमेदवार माऊली ताकवणे व सयाजी ताकवणे यांच्या हस्ते एक मानाची कुस्ती लावून पंच कमिटीने शौकिनांना सुखद धक्का दिला.पंच म्हणून विक्रम ताकवले, प्रमोद ताकवणे, रवी बोत्रे, राहुल ताकवले यांनी काम पाहिले. या वेळी सरपंच सोपान जाधव, उपसरपंच संभाजी ताकवणे, नामदेव ताकवणे, सुभाष बोत्रे, पोपटराव ताकवणे, सयाजी ताकवणे, माऊली ताकवणे, तुकाराम ताकवणे, सर्जेराव जेधे, सोमनाथ ताकवणे, महेश शेळके, सुरेश ताकवणे, नाना जेधे, संतोष ताकवणे, मल्हारी बोत्रे, वैभव बोत्रे, नामदेव काळे आदी उपस्थित होते.अवघ्या २ दिवसांत ८ लाख लोकवर्गणी जमा तुकाईदेवी यात्रेसाठी भाविकांनी स्वेच्छेने लोकवर्गणी जमा करण्यात आली. महादेव ताकवणे, चंद्रकांत बोत्रे व राहुल टिळेकर यांच्यासह ग्रामस्थांनी ही वर्गणी जमा केली. कसलीही खंडणी, दमदाटी न होता स्वेच्छेने ८ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
तुकाईदेवी यात्रेत रंगला कुस्त्यांचा थरार
By admin | Published: February 19, 2017 4:36 AM