पिंपरी: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे क्षेत्र युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी मी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देहू येथे दिले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीमहाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अनुबंध उलगडताना संभाजी महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची गुरुस्थानी मानले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे, अशी आमची भावना आहे.’’.................................संभाजीराजे म्हणाले, ‘‘युनिस्कोमध्ये जागतिक वारसा हक्क मध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे अमृत जागतिक वारसा हक्क आणि दुसरे म्हणजे मृत जागतिक वारसा हक्क. महाराष्ट्रातील जागतिक वारसा हक्क म्हणून तीन स्थळांची नोंद आहे. एक म्हणजे अजंठा- वेरुळची लेणी, दुसरा एलिफंटा आणि तिसरा मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे होय. ज्या गोष्टीला स्पर्श करता येत नाही अशा अमृत वारसा हक्क मध्ये नोंद करता येते. वारीला साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात २० लाख लोक एकत्र येतात. ही गोष्ट अमृत वारसा हक्क यामध्ये नोंदविली जावी, यासाठी युनेस्कोमध्ये नोंद होण्यासाठी दोन वर्षे अगोदर मी संसदेत विषय मांडला होता. रायगडास मृत वारसा हक्क मध्ये नोंद करण्याबरोबरच देहू आणि आळंदीला मोठी परंपरा आहे. या स्थळांची नोंद अमृत जागतिक वारसा हक्कमध्ये करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’......................घरीच बसून वारी करासंभाजीमहाराज यांनी वारकऱ्यांनी घरीच बसून वारी करावी, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात आपण सगळे आहोत. त्यामुळे वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. संकटातून बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाची वारी ही घरीच बसून अनुभवावी. कोरोना गेल्यानंतर पुढील वर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा करू.’’