लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुरविण्यात येणाऱ्या बससेवेच्या शुल्कात संचालक मंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी परस्पर वाढ केली आहे. संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घ्यायला मुंढे पीएमपीचे मालक आहेत का, असा संतप्त सवाल स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे. यामुळे नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडपाठोपाठ पुण्यातही लोकप्रतिनिधी विरुद्ध तुकाराम मुंढे असा वाद पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापौर मुक्ता टिळक यांनी पत्र पाठवून शुल्कवाढीचा फेरविचार करण्यास सांगूनही पीएमपी प्रशासन त्यावर ठाम असल्याने पीएमपी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. या वेळी महापौर मुक्ता टिळक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘पीएमपीच्या संचालक मंडळाची मंजुरी न घेता बसची शुल्कवाढ करणे योग्य नाही. हा धोरणात्मक निर्णय असतानाही प्रशासकीय निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका पीएमपीची भागधारक आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.’’पीएमपीकडून महापालिकेच्या १६ व खासगी १३ अशा एकूण २९ शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी बस पुरविल्या जात होत्या. या सेवेसाठी शाळांकडून ६१ रुपये प्रतिकिमी दर पीएमपीकडून आकारला जात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या दरामध्ये मोठी वाढ करीत १४१ रुपये प्रतिकिमी दर शाळांकडून घेण्यात यावा, असा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी या दरवाढीचा फेरविचार करावा, असे पत्र तुकाराम मुंढे यांना पाठविले होते. मात्र हा पीएमपी प्रशासन दरवाढीवर ठाम आहे. शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी सवलतीच्या दरात बससेवा पुरविण्यासाठी महापालिकेकडून २५ टक्के अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले होते, मात्र हे अनुदान पालिकेकडून मिळत नसल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
तुकाराम मुंढे पीएमपीचे मालक आहेत का?
By admin | Published: June 21, 2017 6:21 AM