पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला सक्षम करण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या निर्भीड अधिकाऱ्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून पुण्यात यायलाच हवे. तसेच त्यांना पूर्णवेळ ‘पीएमपी’चीच सेवा सोपविणे आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी पीएमपी प्रवासी मेळाव्यात करण्यात आली.पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने रविवारी प्रवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रवाशांनी पीएमपीविषयीच्या विविध तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, आपचे शहर समन्वयक मुकुंद किर्दत, मंचचे अध्यक्ष जुगल राठी, निमंत्रक विवेक वेलणकर, सचिव संजय शितोळे आदी उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या मुंढे यांची शुक्रवारी पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे पद स्वीकारण्याबाबत मुंढे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांची बदली करण्यात आली असली तरी हे पद त्यांच्या ज्येष्ठतेनुसार योग्य नसल्याने ते पुण्यात येणार नाहीत. महापालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करून पीएमपीचा अतिरिक्त भार देण्याबाबत बोलले जात आहे. या मुद्यावर मेळाव्यात चर्चा झाली.शहराची बससेवा सुधारण्यासाठी मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचीच गरज आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांनी अत्यंत कमी कालावधीत चांगली कामगिरी केली. मुंढे हेही अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने ते आल्यास पीएमपीचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारायलाच हवे. हे पद मुंढे यांच्या ज्येष्ठतेनुसार योग्य नसेल तर राज्य शासनाने पदाचा दर्जा वाढवावा. तसेच त्यांच्याकडे पालिकेचा भार न देता पीएमपीसाठीच पूर्णवेळ नेमणूक करायला हवी. त्यासाठी राज्य शासनाकडे मंचमार्फत पाठपुरावा केला जाईल, असे राठी व वेलणकर यांंनी स्पष्ट केले. डॉ. चौधरी यांनीही याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
तुकाराम मुंढे तुम्ही याच...
By admin | Published: March 27, 2017 3:20 AM