पुणे : राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता बदल घडल्यानंतर आगामी दोन वर्षांत येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेऊन काही बदल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. पुण्यात भाजपचा वारू रोखण्याकरिता ही खेळी केली जाणार असल्याचे विरोधी पक्षांकडून सांगितले जात आहे.
पुण्याचे पालकमंत्री कोण होणार यावर पुढील गणिते अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. एकेकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या महापालिकांसह विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पकड होती. २०१४ सालच्या मोदी लाटेत ही पकड ढिलावत गेली. परंतु, राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे या दोन्ही शहरांवर पुन्हा पकड घेण्याचा प्रयत्न होणार आहे. पुणे महापालिकेत भाजपचे ९९ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे ४३ तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा नगरसेवक आहेत. पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांची नियुक्ती होईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. सरकारकडून महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातील अतिवरिष्ठ पदांवरील अधिकाºयांच्या बदल्या करून तेथे मर्जीतील अधिकाºयांच्या नेमणुका केल्या जाण्याची शक्यता आहे. .....पालिकेचे वर्तमान आयुक्त सौरभ राव हे गेले महिनाभर मसुरी येथे प्रशिक्षणाकरिता गेलेले होते. सोमवारी ते पालिकेत परतले. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यांची जानेवारीमध्ये पदोन्नती अपेक्षित आहे. त्यामुळे पदोन्नतीने त्यांची बदली होणार हे नक्की. त्यांच्या जागी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. पालिकेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्येही कुजबूज सुरू झाली आहे.
मुंढे संचालक असताना पीएमपीएमएलचा गाडा रूळावर आणण्याकरिता प्रयत्न केले होते. त्यांची कारकीर्द शिस्तीची ठरली होती. नाशिक महापालिकेतही सर्वाधिक भाजपचेच नगरसेवक त्यांच्याविषयी नाराज होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.