पुणे : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी आज (बुधवार दि. २२ नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून नगरसेवकांना चकित केले.पाऊण तासाच्या भाषणात मुंडे यांनी ते करीत असलेल्या सर्व सुधारणांचा सविस्तर आढावा घेतला. आपण येण्याआधी ही संस्था तोट्यात होती. त्याचा अभ्यास करून आपण सर्व बदल करीत आहोत. त्याचा परिणाम म्हणून ही सेवा आज तोटा कमी अशा अवस्थेत आली असल्याचा दावा मुंडे यांनी केला. खासगी बसेसची संख्या कमी केली. कंपनीच्या बसेसची संख्या वाढवली. एका बसमागे किती कर्मचारी असावेत याचे निकष आहेत, त्याचे पालन केले जात नव्हते. एका बस मागे ९ पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यामुळे तोटा वाढत होता. आता एका बसमागे फक्त ५ कर्मचारी केले. रूट वाढवले. बस वाढवल्या, असे मुंडे यांनी सांगितले. प्रवासी केंद्रीत सेवा करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
मुंडे यांच्या भाषणाआधी काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी मुंडे यांना स्वत: ची ओळख करून द्यायला लावली. आबा बागूल यांनी महापालिकेने आणलेले हे विषयपत्र अवलोकनासाठी आहे का, असा सवाल केला. त्यावरून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघांनाही अन्य सदस्यांनी त्यांना शांत केले. त्यानंतर बागूल यांचे भाषण सुरु झाले.
पुन्हा पीएमटी सुरू करा : बागुलआमच्या सूचना कचऱ्यात का फेकता? तोटा कमी व्हावा म्हणून या सभागृहाने अनेक उपाय सूचवले, काय केले त्याचे ते सांगा. मनमानी चालणार नाही. गेल्या १० वर्षात ९९० कोटी रुपये दिले आहेत. महापालिकेने याचा हिशोब विचारायचा नाही का? किती वर्षे पैसे द्यायचे पालिकेने? पीएमटी असताना कधीही पैसे द्यावे लागत नव्हते. बंद करा कंपनी व पीएमटी सुरू करा परत.- आबा बागुल