पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाशी येरवडा कारागृहात असलेल्या तुकाराम सुपे यांचा काही एक संबंध नाही. त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आला आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल असा युक्तिवाद अॅड. मिलिंद पवार यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या न्यायालयात सुपे याने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पोलिसांना तपासास पूर्णपणे सहकार्य केले असल्याचे अॅड. पवार यांनी युक्तिवादादरम्यान नमूद केले. दरम्यान, याप्रकरणात न्यायालयाने पुणे सायबर पोलिसांना नोटीस पाठवित सुपे यांच्या जामिनावर म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर, पुढील सुनावणी होणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात 2018 मध्ये निघाली होती. त्यानंतर 15 जुलै 2018 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोंबर 2018 मध्ये लागला होता. ही सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी जी.ए सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेत स्थळावर प्रसिध्द करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेऊन जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विन कुमार याने तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (6 ऑगस्ट 2016 ते दि. 31 ऑगस्ट 2018), तुकाराम सुपे, प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैर व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.