लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले.वारकरी पंढरीचा ।धन्य धन्य जन्म त्याचा ।।इंदापुरातून विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती इ. गावांचा पाहुणचार स्वीकारीत पालखी दुपारी येथे दाखल झाली. त्या वेळी उदयसिंह पाटील, प्रशांत पाटील, किरण पाटील, विकास पाटील, मयूरसिंह पाटील, महादेव घाडगे, अॅड. कमलाकांत तोरणे, सरपंच निरुपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे, संतोष सूर्यवंशी आदी प्रमुख ग्रामस्थांनी वेशीत पुष्पहार अर्पण करून तोफांची सलामी दिली. श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिंडी काढली होती. त्यामध्ये मुला-मुलींनी वारकऱ्यांची वेषभूषा केली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष व डोक्यावर तुळशी वृंदावन यामुळे विद्यार्थी दिंडी अधिक तेजोमय दिसत होती. पालखीबरोबर चालत येथील ब्रह्मर्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात रथ येताच दर्शनासाठी झुंबड उडाली. त्यानंतर रथातून पालखी उतरवून खांद्यावर मुख्य पेठेतून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व ग्रामस्थांनी वाहून नेली. बाजारतळ प्रांगणात सजवलेल्या शामियान्यात दर्शनासाठी ती ठेवण्यात आली. पुरुष व स्त्रियांसाठी वेगळ्या दर्शनाची सोय केली होती.दुपारी विश्रांती घेऊन पालखी सराटी मुक्कामी नीरा नदीकाठी रवाना झाली. पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असून उद्या पहाटे नीरास्नानानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेश करील. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी वारीत पायी प्रवास केला. बावडा येथे रत्नाई निवासस्थानी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, सचिन कांबळे यांनी सकाळी आंबेडकर चौकात नाश्त्याची व चहापानाची सोय केली होती. छोट्या-मोठ्या मंडळींनीही वारकऱ्यांची सेवा केली. आरोग्य विभाग ग्रामपंचायतींच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या.
बावड्यात तुकोबारायांचे जंगी स्वागत
By admin | Published: June 29, 2017 3:28 AM