जुन्नर - भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत, पारंपरिक वाद्यांच्या गजरात, तुळजापूरच्या भवानीमातेच्या पलंगाचे जुन्नरहुन तुळजापूर कडे प्रस्थान झाले. भाविकांनी यावेळी पलंग डोक्यांवर तर कधी हातावर उचलत तुळजाभवानी मातेच्या जयघोषात मिरवणूक काढली.जुन्नरमधील तिळवण तेली समाजाच्या कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. पलंगाचे भाद्रपद पंचमीला जुन्नर येथे घोडेगाव येथून आगमन झाले होते. त्यानंतर भाद्रपद नवमीला (दि.१९ सप्टेंबर) पलंगावर देवीची गादीची स्थापना करण्यात आली. घोडेगाव ते तुळजापूर या पायी प्रवास मार्गात फक्त जुन्नर येथे १० दिवस पलंगाचा मुक्काम जुन्नर येथे असतो. या औचित्याने भागवत कथा ,पूजा आरती विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पलंगाचे प्रस्थानाच्या दिवशी शहरातील नागरिकांच्या दारात पलंग दर्शनासाठी नेण्यात आला. नागरिकांनी पलंगांच्या स्वागतासाठी रस्त्यावर नवीन पायघड्या अंथरल्या होत्या. पूर्ण शहरातून पलंगाची मिरवणूक काढण्यात आली. तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष संजय कर्पे, उपाध्यक्ष जयप्रकाश फल्ले, सचिव गोकुळ भागवत, खजिनदार राजेंद्र खेत्री, नगरसेवक अविनाश कर्डीले, कैलास गरिबे, भानुदास खोंड, दत्ता कर्डीले, महेश घोडेकर, महेश गरीबे यांच्यासह कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.राजमाता जिजाऊ पलंगाच्या दर्शनासाठी येत असल्याचे इतिहासात संदर्भ मिळतात.यात्रेची ही परंपरा १२ व्या शतकापासूनची आहे.
जुन्नरमध्ये तुळजाभवानीमातेच्या पलंगाचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:54 AM