पुणे : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. शहरातील गजबजीचे आणि गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीबागेतील आणि मंडईतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विक्रेत्यांचे व्यवहार पेटीएम आणि स्वाइप मशिनच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे तुळशीबाग आणि मंडईचा प्रवास कॅशलेसच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसून आले.नोटाबंदीच्या ५0 दिवसांनंतरही नागरिकांच्या हातात सुट्टे पैसे पडले नाहीत. केवळ ग्राहकांनाच नाही तर विक्रेत्यांनाही नाईलाज म्हणून कॅशलेस व्यवहार करावे लागत आहेत. केंद्र शासनानेही कॅशलेस व्यवहाराबात केलेल्या जागृतीला काहीसा सकारात्मक प्रतिसाद तुळशीबागेतील आणि मंडईतील विक्रेत्यांकडून दिला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. तुळशीबागेतील छोट्या व्यावसायिकांना कॅशलेस व्यवहार करणे खरंच शक्य आहे का? याचा आढावा घेतला असता तुळशीबागेतील ५० टक्क्यांहून अधिक व्यावसायिक स्वत: किंवा इतरांच्या मदतीने कॅशलेस व्यवहार करत असल्याचे दिसून आले. ग्राहकांची गैरसोय होत असल्याने त्यांनी कॅशलेस साधनांचा वापर करत असल्याचे तुळशीबागेतील विक्रेत्यांनी सांगितले. परंतु, जे व्यावसायिक कॅशलेस व्यवहाराबाबत अज्ञानी आहेत, ज्यांना स्मार्ट फोन वापराबाबत फारशी माहिती नाही, अशा व्यावसायिकांकडून रोखीने व्यवहार करणे योग्य असल्याचे सांगितले. मंडईतील विक्रेते कॅशलेस व्यवहार करत असले तरी मोठे व्यापारी त्यांच्याकडून रोख रकमेची मागणी करत आहेत.