नव्या पिढीसमोर येणार खजिना : १९५२ पासून गाजलेल्या देखाव्यांच्या सजावटीची मिळणार माहिती
पुणे : गणेशोत्सवात १९५२ पासून गाजलेल्या १० देखाव्यांची सजावटीची माहिती तरुणवर्गाला मिळावी, याकरिता मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे ‘शिल्पकारांचा गणपती’ या विशेष मालिकेचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवात दहा दिवस ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.
या वेळी ज्येष्ठ विश्वस्त विवेक खटावकर, अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष म्हणून विकास पवार यांची निवड करून त्यांचा खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या परिस्थितीत उत्सवावर निर्बंध असताना घरबसल्या गणेशभक्तांना त्याचा लाभ घेता येणार आहे. या देखाव्यांवर आधारित एक प्रश्नमंजूषा होणार आहे.
१९५२ सालापासून तुळशीबाग मंडळाची सजावट कलामहर्षी डी. एस. खटावकर करत होते. कै. खटावकर अभिनव कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवेत होते. त्या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, यासाठी ते त्यांना गणेशोत्सवात सजावटीचे काम करण्याची संधी द्यायचे. ते विद्यार्थी आता त्यांच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मुरली लाहोटी, शिल्पकार विजय दीक्षित, पुरातत्व खात्यातून निवृत्ती झालेले विजय विश्वासराव, इंटेरिअर डिझाईनर अजय पंचमतिया, प्रसिद्ध चित्रकार शाम भूतकर अशा अनेक कलाकारांची जडणघडण या तुळशीबागेच्या मंडळात झाली. त्यावेळी झालेल्या सजावटीची वैशिष्ट्ये त्या सजावटीत काम करणाऱ्या कलावंताकडून गणेशभक्तांना ऐकता येणार आहे. याशिवाय ऑनलाईन आरती, अभिषेक, दर्शनाची सोय पण करणार आहे. भक्तांनी घरबसल्या या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे.