पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये डिपॉझीट राखता न आलेल्या पदाधिकाऱ्यांना अद्याप बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये शुद्धीकरणाची गरज असल्याची टिप्पणी माजी मंत्री पतंगराव कदम व हर्षवर्धन पाटील यांनी केली. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग आल्याची चर्चा होती. काँग्रेस भवनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पहिल्यादाच अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, माजी मंत्री व आमदार मंडळी एकत्र आली होती. ही संधी घेऊन हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षातून ‘हा गेला, तो गेला’ प्रकार सुरू झाला आहे.’’ सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे, अशी टिप्पणी पाटील यांनी केली. हा धागा पकडून पतंगराव कदम म्हणाले, ‘‘दिल्ली व मुंबईत जे चालायचे, ते चालू द्या. कार्यकर्त्यांनी कोणी दिशा देईल, याची वाट पाहत बसू नये. पक्षात ज्यांची कुवत नाही, त्यांना पदे आहेत. निवडणुकीत डिपॉझीट जप्त झाल्यानंतरही कोणतीही पदे बदललेली नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खूषमस्करे होण्यापेक्षा झोकून देऊन काम केले पाहिजे.’’दरम्यान, हर्षवर्धन पाटील व कदम यांच्या भाषणाचा रोख कोणावर होता, याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात होती. (प्रतिनिधी)
अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात टोमणेबाजी
By admin | Published: January 30, 2015 3:45 AM