पुणे : दुरुस्तीअभावी बंद असलेल्या ६२५ बसपैकी ९ वर्षांपूर्वीच्या २२५ बस वगळून उर्वरित ४०० बस तातडीने रस्त्यावर आणण्याच्या सूचना पुणे परिवहन महानगर लिमिटेडच्या संचालक मंडळाने पीएमपी प्रशासनास केल्या आहेत. बंद असलेल्या बसच्या दुरुस्तीला किती खर्च अपेक्षित आहे याची सविस्तर माहिती सादर करण्याचेही आदेश देण्यात आले.पीएमच्या दुरुस्तीअभावी ६२२ बस बंद असल्याने शहरातील परिवहन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पीएमपीच्या दुरुस्तीवर दरमहा ७५ लाख रुपयांचा चुराडा होत असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात बस बंद असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. पीएमपीच्या स्पेअरपार्ट खरेदीत गैरव्यवहार झाला असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पीएमपी संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजीव जाधव, पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर सुशीला धराडे यांच्यासह संचालक उपस्थित होते. दत्तात्रय धनकवडे यांनी पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. ९ ते १० वर्षांपूर्वीच्या बस दुरुस्त करून रस्त्यावर आणल्यास त्या बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा बस स्क्रॅप करण्याचा धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. २२५ बस या ९ वर्षे ओलांडलेल्या आहेत. उर्वरित ४०० बसच्या दुरुस्तीस किती खर्च येईल याची सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार निधी उपलब्ध करून देऊन बस रस्त्यावर आणल्या जातील, असे धनकवडे यांनी सांगितले.