सोमाटणे : शासनाने व्यवहारातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांची पूर्णत: धांदल उडाली असून, त्याचा परिणाम सोमाटणे येथील टोल वसुलीवरही दिसून आला. टोलनाक्यावर ५०० व १००० नोटा दिवसभर स्वीकारण्यात येत होत्या; परंतु प्रत्येक जण आपणास आपल्या किरकोळ व्यवहारासाठी ५०० व १००० च्या नोटा टोल भरण्यास देत असल्याने सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत होता. काही वेळेस तर वाहनचालक व टोलवसुली कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाददेखील होत होते. वाहनचालकाकडे सुट्या पैशांचा आग्रह होत असल्यामुळे येथील टोलवसुली धिम्या गतीने होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले. मात्र, दुपारनंतर शासनाने सर्व टोल ११ तारखेपर्यंत टोल वसुलीसाठी बंद राहतील, अशी घोषणा केल्यानंतर सोमाटणे टोल नाक्यावर रात्री सुमारे ८ नंतर टोलवसुली बंद करण्यात आली. तरी शासनाच्या आदेशाने ही टोलवसुली सध्या आम्ही बंद केली असून, आदेशानुसार ११ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ती बंद असणार असल्याचे टोलवसुली अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
सोमाटणे टोल नाक्यावरील वसुली बंद
By admin | Published: November 10, 2016 1:03 AM