लोकमत न्यूज नेटवर्ककळस : रुई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्याविरोधात ग्रामस्थांनी आज येथील दवाखान्याला टाळे ठोकले, तर काही वेळ गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मुख्य चौकात दहन केले. येथील पशुधन विकास अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी सरपंच रूपाली कांबळे, उपसरपंच बबन मारकड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, आकाश कांबळे, यशवंत कचरे, हरिश्चंद्र माने, विनोद सपकळ, अंकुश लावंड, पद्माकर लावंड उपस्थित होते. सरपंच रूपाली कांबळे म्हणाल्या, ‘‘गेल्या कित्येक दिवसांपासून गोपालकांना सेवा देण्यास असमर्थ ठरलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांच्याबाबतीत येथील ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी मांडल्या होत्या. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतीने ठराव करून या पशुधन अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत ठराव करून तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. रुई, न्हावी, कडबनवाडी, मराडेवाडी, थोरातवाडी आदी गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या दवाखान्यातून गेल्या कित्येक दिवसांपासून गोपालकांना सेवा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ज्या ठिकाणी सेवा दिली गेली त्या शेतकऱ्यांकडून नियमबाह्य रक्कम आकारल्याचीही काही उदाहरणे आहेत. शासनाकडून आलेले चारा बियाणे, औषधे आदींचा साठा दवाखान्यातच पडून आहे. नागरिकांना शासकीय योजनांचीही माहिती दिली जात नाही. याच सगळ्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे मांडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनीही दवाखान्यास भेट देऊन माहिती घेतली होती. ग्रामस्थांनी उपस्थितांसमोर दवाखान्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला होता. उपसरंपच बबन मारकड म्हणाले, ‘‘शासनाचा लाखो रुपयांचा मासिक खर्च होत असताना गोपालकांना मात्र त्या तुलनेत सेवा मिळत नाही. यामुळे लोकांनी आपल्या मनातील रोष आज व्यक्त केला आहे. सभापती प्रवीण माने यांच्यावर चुकीचे आरोप करीत संघटनेच्या माध्यमातून दबाव आणण्याचे कृत्य म्हणजे गावात एकाधिकारशाही गाजविण्यासारखे आहे. माने यांनी लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यानुसार सेवा देण्याची सूचना केली होती. मात्र, डॉक्टरांनी त्याचा विपर्यास करून झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण न घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे अशा अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
रुईच्या पशुवैद्यकीय आरोग्य केंद्राला टाळे ठोकले
By admin | Published: June 10, 2017 1:53 AM