लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) अंतर्गत राज्यात गेल्या साडेतीन वर्षांत शेतमालाची साडेचार हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. यातून दीडशे लाख क्विंटल शेतमालाची ऑनलाइन विक्री झाली असून, ११ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन बाजारासाठी नोंदणी केली.
शेतमालाला स्पर्धात्मक भाव मिळावा, यासाठी एप्रिल २०१६ पासून ई-नाम योजना सुरू केली. तीन टप्प्यांमध्ये ११८ बाजार समित्यांचा यात समावेश केला. गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-लिलाव, शेतमालाचे वजन, विक्री करार, बिल व शेतकऱ्यांना ऑनलाइन मालाचे पैसे देणे याचा अंतर्भाव योजनेत आहे.
शेतमालाची संपूर्ण रक्कम ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिलेली उचल अथवा रोख रक्कम त्यांना शेतमाल बिलातून वजा करता येणार नाही. राज्यात सप्टेंबर २०१७ मध्ये ३० बाजार समित्यांमध्ये ही सेवा सुरू केली. पाठोपाठ जानेवारी २०१८ मध्ये ३० आणि जून २०२० मध्ये आणखी ५८ बाजार समित्यांमध्ये ई-नाम सुरू झाले.
ई-नामअंतर्गत ११.९० लाख शेतकऱ्यांची आणि २५८ शेतकरी गटांची नोंदणी झाली आहे. तसेच ७३ बाजार समित्यांमधील ६७८ व्यापाऱ्यांनी ११ हजार ४०४ शेतकऱ्यांना १०६ कोटी ३४ लाख रुपये ऑनलाइन दिले. शेतमालाची गुणवत्ता तपासण्यासाठी साठ बाजार समित्यांमध्ये लॅब कार्यान्वित केली असून, ५८ बाजार समित्यांमध्ये लॅब उभारण्यात येत असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
——
वणी बाजार समितीने पाऊणशे कोटींचे ई-पेमेंट केले
राज्यात वणी बाजार समितीने सर्वाधिक ७२.५० कोटी रुपये ऑनलाइनद्वारे दिले आहेत. परभणी, वरोरा, दौंड, भोकर या बाजार समित्यांनी प्रत्येकी २ कोटींवर ऑनलाईन बिले अदा केली आहेत. अमरावती, शिरूर, येवला बाजार समित्यांनी १ कोटींवर बिले ऑनलाइन दिली असल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.
——
ई-नामची सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०२१ची स्थिती
- ११८ बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू, दीडशे लाख क्विंटल शेतमालाची विक्री
- ५८ बाजार समितीत शेतमालाची आर्द्रता तपासण्याची सुविधा
- ७३ बाजार समित्यांमध्ये १०६.३४ कोटी रुपयांचे ऑनलाइन पेमेंट
- शेतकरी नोंदणी ११.९० लाख
- खरेदीदार व्यापारी नोंदणी १९,७०६
- आडते नोंदणी -१६,०५०
- शेतमालावर बोली लावण्याचे प्रमाण- ६.१७