शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:48 PM2024-04-30T13:48:18+5:302024-04-30T13:52:49+5:30

Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे.

Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission | शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

Amol Kolhe ( Marathi News ) : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिलं आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनाही तुतारी हे चिन्ह दिलं जात असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकतंच चिन्हांचं वाटप केलं आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. या चिन्हाचं आयोगाकडून मराठीत तुतारी असे भाषांतर करण्यात आलं आहे. खरंतर हे चिन्ह दिसण्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. मात्र आयोगाने ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी असं केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुतारी चिन्ह मिळालेले वाडेकर काय म्हणाले?

अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हे चिन्ह मिळालं आहे. "मी निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे या चिन्हामध्ये मतदारांची दिशाभूल होणार नाही," असं वाडेकर यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी घेतला होता आक्षेप

बारामती लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारालाही आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. ट्रम्पेट चिन्ह आणि ‘तुतारी’त साधर्म्य असल्याने बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला होता. आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी सांगितले होते.

दरम्यान, ट्रम्पेट या वाद्याचे ‘तुतारी’ असे भाषांतर आयोगाच्या पुस्तकात असल्याने मतदारांत गोंधळ निर्माण झाल्याचे सुळे यांनी आक्षेपात म्हटले होते. ट्रम्पेट हे मुक्त-चिन्ह असून त्याचे वाटप अगोदरच झाले आहे, त्यामुळे आता यावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली आहे. तसेच मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्यांची नावे नाहीत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याचा प्रश्न नाही, दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही,” असेही चोकलिंगम यांनी स्पष्ट केले होते.
 

Web Title: Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.