पुणे: भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सत्तेच्या ९ वर्षात भाजपने पुणे शहरासाठी केले तरी काय? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यावरून या युद्ध सुरू झाले.
जोशी यांनी असा प्रश्न विचारतानाच सत्तेच्या ५ वर्षात भाजपने पुणे शहराला काहीच दिले नाही असे म्हणत भाजपचे स्थानिक पदाधिकारी पुणेकरांचे गुन्हेगार आहेत अशा शब्दात त्यांची संभावना केली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप, पुणे या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसने मग राजवाडावजा कार्यालय बांधण्याशिवाय दुसरे काय केले असा प्रश्न विचारला आहे. यात कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव नाही, मात्र ट्विटर पेजवर काँग्रेसभवनचे चित्र आहे व त्याखाली भाजपने शहरात राबवलेल्या मेट्रो, इलेक्ट्रिक बस, चांदणी चौक प्रकल्प, समान पाणी पुरवठा या योजनांची छायाचित्र दिली आहेत. या अकाउंटवर कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव नाही.
त्याला काँग्रेसच्या सोशल मिडिया सेलचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी त्यांच्या ट्विटरवर उत्तर दिले आहे. स्वातंत्र्यसैनिक न. वि. गाडगीळ यांच्यासारख्यांनी पत्नीचे दागिने गहाण टाकून बांधलेल्या काँग्रेसभवनला राजवडा म्हणावे यावर टीका केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वास्तूला महत्व आहे. इथेच नारायण दाभाडे नावाचा युवक इंग्रजांची गोळी खाऊन हुतात्मा झाला. याच वास्तूमधून देशभक्त केशवराव जेधे, गाडगीळ यांनी महाराष्ट्रात काँग्रेस रुजवली. त्याचाच त्रास भाजपवासियांना होत असावा असे पुरंदरे यांनी म्हटले आहे.
लोकमत बरोबर बोलताना पुरंदरे म्हणाले, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. एखाद्या पवित्र वास्तूला त्यांनी राजवाड्याचे नाव द्यावे यावरून त्यांच्या बुद्धीची झेप कळते. त्यांनी विकासकामे म्हणून जी छायाचित्रे दिली आहेत, ती सर्व अपूर्ण कामाची आहेत. वर्ष होऊन गेले, पंतप्रधानांनी मेट्रोचे लोकार्पण करून, अजून ती लोकांच्या उपयोगात आलेली नाही यावरून त्यांच्या विकासकामंचा दर्जा लक्षात येतो. भ्रष्टाचार हाच ज्या पक्षाचा स्थायी भाव आहे, त्यांनी त्यागातून उभे राहिलेल्या काँग्रेसभवनसारख्या वास्तूवर राजवाडा अशी टीका करावी हे योग्य नाही.