लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर यशवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शारिरीक व मानसिक ताण न घेण्याची सक्त ताकीद डॉक्टरांनी दिली होती. पण शिकण्याच्या जिद्दीने या आव्हानांवर मात करत त्याने बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के तर एमएचटी-सीईटी परीक्षेत ९६.५२ टक्के गुण मिळविले. आता पुण्यात येऊन अभियांत्रिकीची पदवी मिळविण्याची त्याची इच्छा आहे.
यश गालपेल्ली असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अहमदनगरचा असून २०१७ मध्ये दहावीत असताना त्याला त्रास सुरू झाला होता. पुण्यात नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी त्याची तब्येत खालावल्याचे दिसत होते. नाकातून रक्त येणे, तोल जाणे, सांधेदुखी, पोटाला सूज येणे ही यकृताच्या रोगाची लक्षणे होती.
‘विल्सन डिसीज’ या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर २०१८ मध्ये त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यकृत दानासाठी त्याची मावशी तयार झाली व त्यांचे यकृत जुळल्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यशचे वय आणि अन्य अवयव यात गुंतले असल्याने ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. शस्त्रक्रियेनंतर सात दिवसात त्याला घरी सोडण्यात आले, असे रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपिन विभुते व डॉ. दिनेश झिरपे यांनी सांगितले. उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल रुग्णालयाने मंगळवारी (दि. २२) यशचा सत्कार केला.
चौकट
जिद्दीला ‘यश’
प्रत्यारोपण केल्यानंतर यशने बारावी आणि सीईटीचा अभ्यास सुरू केला. प्रत्यारोपणामुळे शारीरिक व मानसिक ताण घेणे जिकीरीचे होते. पण त्याने ताण न घेता शिस्तीने अभ्यास केला. रात्रीचे जागरण केले नाही. “चांगले गुण मिळतील, याची खात्री होती. आता पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घ्यायचाय,” असे यशने सांगितले. प्रत्यारोपणामुळे आपण सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगु शकणार नाही, असा गैरसमज आहे. अशी भिती वाटणाऱ्यांनी माझ्याकडे पाहावे, असे तो म्हणाला.