पुणे : इयत्ता बारावी म्हणजे आयुष्याचा शेवटचा बिंदू नाही. अलीकडच्या काळात बारावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागत आहे. पूर्वी हाच निकाल ७० ते ८० टक्के लागत होता. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे होते. मात्र, नापास झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवले नाही; उलट इतर पर्यायांचा स्वीकार करून जीवनात लौकिकार्थाने यश संपादन केले.
इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात अनेकांनी अपेक्षित यश संपादन केले; तर काहींच्या पदरी निराशा पडली. इयत्ता बारावी परीक्षा म्हणजे जीवनाचे शेवटचे सत्य नाही. वर्षभर केलेल्या अभ्यासक्रमाचे एका विशिष्ट पद्धतीने केलेले मूल्यमापन म्हणजे बारावीचा निकाल आहे. कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे बारावीचा निकाल सर्वकाही असा विचार विद्यार्थ्यांनी मनात आणू नये, असे शिक्षणतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले...
- इयत्ता बारावीमध्ये नापास झालेल्या माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात उज्ज्वल यश संपादन केले आहे. बापू मेंगडे या विद्यार्थ्याने पुण्यातच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती केली. बारावीत नापास झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक्सचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातच करिअर केले.
- जामखेड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने बारावी नापास झाल्यावर स्वतःच्या शेतात डाळिंबाचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सध्या तो जामखेड तालुक्यातील डाळिंब उत्पादनातील सर्वांत प्रगतीशील शेतकरी आहे.
जीवनात यश-अपयश येतच असते; त्यामुळे खचून न जाता प्रत्येक घटनेला धाडसाने सामोरे जायला शिकावे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. बारावीत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. त्यात उत्तीर्ण होऊन पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकतो.
- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
काही वर्षांपासून इयत्ता बारावीचा निकाल ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत लागत आहे. त्यामुळे नापासांची संख्या खूपच कमी आहे. पूर्वी केवळ ७० ते ८० टक्के विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होत होते. उर्वरित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल न उचलता इतर पर्याय स्वीकारून आयुष्यात यश संपादन केले. कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांचे वेळीच समुपदेशन करणे गरजेचे आहे.
- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक