टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे चक्क बारावी नापास असलेला बनावट एमबीबीएस पदवीच्या आधारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालिवत असल्याचे उघड झाले आहे. मेहमूद शेख याने महेश पाटील नाव धारण करून बनावट एमबीबीएसची पदवी घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून हे हॉस्पिटल चालिवले जात आहे. विशेष म्हणजे, आता या ठिकाणी कोरोनाचे २३ रुग्ण उपचारही घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहमूद शेख याने बनावट नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र तयार केले. त्याचबरोबर बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रेही बनवली होती. औरंगाबाद डॉ. शीतल कुमार राम पडवी यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेण्यासाठी यांच्याकडून वेळोवेळी 17 लाख 50 हजार रुपये घेतले. परंतु, त्यांना भागीदार केले नाही. याबाबत पडवी यांनी तक्रार दिल्यावर फसवणुकीचा धक्कदायक प्रकार पुढे आला.
पोलीस निरीक्षक सुरेश राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार: मेहमूद फारूख शेख हा मूळचा पीर बुर्हाणनगर (जि. नांदेड) येथील आहे. त्याने जळगाव येथील डॉक्टर महेश पाटील यांचे नाव धारण केले. त्यांच्या नावाने बनावट पदवीही घेतली होती. पडवी यांच्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे ,शिवाजी ननावरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार महेश गायकवाड दत्तात्रय, तांबे जनार्दन शेळके, पोलीस नाईक विजय कांचन, गुरु जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ या पथकाने कारेगाव येथे जाऊन मेहमूद शेख यास ताब्यात घेतले. त्याच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे शिक्के तयार करणे व महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 कलम ते 30 (2) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या बनावट डॉक्टरला पोलीसांनी अटक केली असून १९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या हॉस्पिटलमध्ये एकूण 23 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यांना आता दुसरीकडे उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे प्रांत अधिकारी
संतोषकुमार देशमुख व तहसूलदार लैला शेख यांनी सांगितले .