पुणे : कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा, हे अद्याप ठरलेले नाहीत. राज्य शासनाकडून अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतरच शिक्षण विभागाकडून निकालाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अध्यादेशाची वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही. सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सूत्राचा अवलंब राज्य मंडळाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल जाहीर करणे उचित ठरणार नाही. बारावीच्या गुणांवर पदवी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे बारावीसाठी कोणत्या मूल्यमापनाचा अवलंब केला जातो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाचा आराखडा व वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मुख्याध्यापकांची कर्तव्ये तसेच नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी परीक्षार्थी आदी विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावेत, यासंदर्भातील सविस्तर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी राज्य मंडळाला बरीच तयारी करावी लागली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठीसुद्धा याच पद्धतीने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावीचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.