लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली महसूल विभागाची फेरफार अदालत पुन्हा एकदा सुरू होत आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवार (दि. २८) रोजी संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा फेरफार अदालत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या १२ हजार ५२७ नोंदी प्रलंबित आहेत.
शासनाने लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून सर्व मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी, नोंदी निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा फेरफार अदालत आयोजित करणेबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड बाबतच्या नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर जुलै २०२१ मधील फेरफार अदालत बुधवार (दि. २८) आयोजित केली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितली.
जिल्ह्यात २६ जुलै अखेर मुदत पूर्ण झालेल्या १२,५२७ नोंदी प्रलंबित असून, या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गतीच्या या कार्यालयाकडून यापूर्वी देखील संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. सदर अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार देखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणेच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
२८ जुलै रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केले.