पुणे : “देशात झालेल्या मधुक्रांतीमुळे मधाची सुमारे ७५ हजार टन निर्यात झाली असून त्यातून सुमारे सव्वा बाराशे कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले आहे. या मधुमक्षिकापालनामुळे शेतकऱ्यांना पुरक उत्पन्न मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त तसेच पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते ऑनलाईन बोलत होते. या वेळी केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम राज्यमंत्री भानूप्रताप सिंह वर्मा, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार सिंह, आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार उपस्थित होते.
राणे म्हणाले, “मधुमक्षिका पालनाची देशाला मोठी परंपरा आहे. या उद्योगामुळे शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. या उद्योगामुळे पर्यावरणाचेही संतुलन साधले जात असून शेतीपुरक व्यवसाय असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जागरुकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत.”
वर्मा म्हणाले, “मध उत्पादन यंदा देशात सुमारे १ लाख ३३ हजार २०० टन इतके झाले आहे. त्यातून सुमारे ३ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ग्रामीण भागात उत्पन्नाचे हे महत्त्वाचे साधन आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या स्थानी आहे. येत्या २०२५ पर्यंत ती तिसऱ्या स्थानी येईल. त्यात लघू उद्योगांचा वाटा मोठा असणार आहे. या उद्योगांचा वाटा सध्या एकूण उत्पन्नाच्या एकतृतियांश इतका आहे. तर निर्यातीत हाच वाचा ४८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी ५ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातील ३.६० लाख कोटींचे वितरण करण्यात आले आहे. मधमाशी पालन क्षेत्राला चालना देण्यासाठी देशात ३९ ‘हनी क्लस्टर’ स्थापन करण्यात आले आहेत”
राज्यात १० कोटींचे अनुदान वाटपया वेळी राणे यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. देशपातळीवर ३०० कोटींचे ६ हजार ८१९ लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. त्यात महाराष्ट्रतील १९१ लाभार्थ्यांना ९.८१ कोटी रुपयांचा समावेश आहे. या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनासाठीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.