पुणे : महावितरणच्या बिल भरणा केंद्रात जमा झालेले पैसे बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले १२ लाख २७ हजार ९२० रुपये व दुचाकी घेऊन कामगार पसार झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी बाबूराव भय्याराम अगरवाल (वय ६०, रा. नगर रोड) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचा कामगार रावसाहेब शाहराम कराळे (वय ४५, रा. बोपोडी) याच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अगरवाल यांच्याकडे महावितरण वीज भरणा केंद्रांची अधिकृत डिलरशीप आहे. त्यांच्याकडे कराळे हा काम करीत होता. औंध रोड येथील भरणा केंद्रात दोन दिवसांमध्ये जमा झालेले १२ लाख २७ हजार ९२० रुपये रोख व धनादेश आकुर्डी येथील बँकेच्या शाखेत भरण्यासाठी २२ एप्रिल रोजी कराळेकडे दिले. कराळे हा त्यांची दुचाकी घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी गेला. कराळे हा पैसे व धनादेश न भरता पळून गेला. शोधाशोध केल्यानंतरही कराळे हा न मिळाल्याने अगरवाल यांनी खडकी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी अधिक तपास करीत आहेत.