लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करून तिला प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या १२ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष अशोक ननवरे (वय ४४, रा. गोकुळनगर, कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे (वय २९, रा. नेरावणे, ता. वेल्हा), मयूर दिलीप शेवाळे (वय २६, रा. शेवाळवाडी, देवाची उरूळी), पंढरीनाथ जगन फडके (वय ५५, रा. नेरे, ता. पनवेल), हरिश्चंद्र भागा फडके (वय ५२), पदमाकर रामदास फडके (वय ३८), ऋषीकेश सूर्यकांत कांचन (वय २३, रा. उरूळी कांचन), संकेत शशिकांत चोरगे (वय २१, रा. भेलकेवाडी, ता. भोर), यश राजू भिंगारे (वय १९), संतोष शिवराम कुडले (वय ४१), राहुल प्रकाश चौधरी (वय ३४, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी सकाळी घडला.
याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे. उच्च न्यायालय व राज्य शासनाने बैलगाडाशर्यतीवर बंदी घातली असतानाही पंढरीनाथ फडके यांनी एकाच्या मदतीने बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले. लोकांना जमविले. बाबरमळा येथे बैलांना गाड्यांना जोडून, त्यांना निर्दयतेपणे मारहाण करून शर्यत घेतली. त्या वेळी पोलीस आयोजक व सहभागी होणाऱ्या इतरांना बैलगाडा शर्यती बेकायदा असल्याचे सांगत होते. तरी त्यांनी फिर्यादी पोलिसांशी वाद विवाद करून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.