-----------
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे खोऱ्यामध्ये असणाऱ्या माळीण फाट्याजवळ पाच ते सहा महिन्यांपूर्वी नवीनच करण्यात आलेला रस्ता सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचून गेला असून, अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे पुढील बारा गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आहुपे खोऱ्यातील आदिवासी जनतेला तालुक्याशी नाळ जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे डिंभा आहुपे हा रस्ता. या भागातील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांनी केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून डिंभे ते आहुपे असा ४८ कि. मी. असणाऱ्या रस्त्यासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरावाचे काम चालू आहे. परंतु भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये सलग दोन-तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आहुपे खाेऱ्यामध्ये असणाऱ्या माळीण फाट्याजवळ मुख्य रस्त्याला मोठा तडा गेला व हा रस्ता दोन फूट खाली खचल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाऊस आणखी वाढला तर संपूर्ण रस्ता तुटेल आणि माळीण, आमडे, पंचाळे, कोंढरे, भोईरवाडी, आहुपे, पिंपरगणे, आघाणे, डोण, न्हावेड, तिरपाड, असाणे, अशा बारा गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी या रस्त्याची पहाणी करून सध्या तात्पुरता भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी कॉंक्रीटची भिंत बांधण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
--
चौकट
--
डिंभे-आहुपे रस्ता हा आहुपे खोऱ्यातील आदिवासी जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा व नेहमीच्या रहदारीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे; परंतु रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी साईडपट्ट्या पोखरून त्या भरण्यास हरकत घेतली जात आहे. दुसरीकडे या साईडपट्ट्या भरावासाठी लागणारा पक्का मुरूम काढण्यासाठी इकोसेन्सिटिव्ह झोनमुळे प्रशासनाकडून हरकती येत आहेत.
———————————————————
कोट १
स्थानिक शेतकऱ्यांनी हा रस्त्या कोरून अत्यंत धोकादायक केला असून, काही शेतकरी साईडपट्ट्या भरावासाठी अडचण करत आहेत. साईडपट्टयांच्या कामासाठी शेतकऱ्यांनी हरकत घेऊ नये. जर हरकत झाली तर अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे साईडपट्ट्या भरण्यासाठी लागणारा पक्का मुरूम इकोसेन्सिटीव्ह झोनमुळे या भागातून काढण्यास परवानगी नाही. त्यामुळेही साईडपट्ट्या भरण्यास अडचण येत आहे. साईडपट्ट्या भराव न झाल्यास यामुळे रस्ता खचण्याचे प्रमाण वाढेल
- संजय गवारी, सभापती, पंचायत समिती आंबेगाव
--
फोटो :- डिंभा ते आहुपे मार्गावरील खचलेल्या रस्त्याची पाहणी करताना पंचायत समिती सभापती संजय गवारी. (संतोष जाधव)