मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले असून, त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेरपरीक्षेसोबतच सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेसाठी ४ जून २०१८ ते १३ जून २०१८ दरम्यान नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. यापुढे १४ जून ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्यांना त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्कासह अर्ज भरल्यानंतर १४ जून ते १८ जूनदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांनी ते बँकेत भरावयाच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. २५ जून २०१८पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे सादर करायच्या असल्याचे परिपत्रकात नमूद केले गेले आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरणे बंधनकारक असून, त्यांना ते त्यांच्या महाविद्यालयांतूनच भरता येणार आहेत.
बारावी फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:27 AM