लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाने औद्योगिक वापराचा ऑक्सिजन बंद करून शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय कारणासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा उद्योग विश्वाला फटका बसला. यामुळेच आता जिल्ह्याच्या वैद्यकीय ऑक्सिजन मागणीत ४४ टक्के घट झाल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी यापुढे २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येईल, असे स्पष्ट केले. परंतु रुग्ण संख्या वाढल्यानंतर, पुन्हा औद्योगिक वापराचा ऑक्सिजन बंद करण्यात येईल, असे देखील स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या दोन-तीन महिन्यांत कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून व कोविड रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व सीसीसी व डीसीएच सेंटर, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये शंभर टक्के मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी २०% ऑक्सिजनचा वापर करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढले.
औद्योगिक प्रयोजनासाठी पुरवठा बंधनकारक
ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन निर्मिती करावी. उत्पादित केलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी ८० टक्के वापर हा मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयांना करण्यात यावा. तसेच उर्वरित ऑक्सिजनपैकी २० टक्के वापर हा औद्योगिक प्रयोजनासाठी करण्यात यावा. यामध्ये प्रथम प्राधान्य रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येऊन त्यानंतर औद्योगिक प्रयोजनासाठी पुरवठा करण्यात यावा. कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने आवश्यकता भासल्यास औद्योगिक प्रयोजनासाठी वळविण्यात आलेला २० टक्के ऑक्सिजनचा वापर हा रुग्णालयांसाठी पुरविण्यात येईल. असे लेखी आदेश काढले आहेत.