भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करुणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजना २४ दिवसांपासून बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात आली. चोवीस दिवसांनंतर ही योजना आज सुरू करण्यात आली. ही योजना बंद राहिल्याने २५६ एमसीएफटी पाण्याचा लाभ शेतकºयांना मिळू शकला नाही. तसेच या पाण्यापासून भिजणारे २५०० हेक्टर क्षेत्रही कोरडे राहिल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका ज्वारी पिकाला बसला. २४ दिवसांनंतर ही योजना सुरू झाल्याने लाभार्थ्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.
पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याच्या मागणीत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एवढ्या अडचणी कधीच आल्या नाहीत. मात्र, या वर्षी या योजनेचे योग्य नियोजन झाले नाही. यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले. योजना एक दिवसही बंद राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र दिवाळीत ही योजना बंद होती. त्यानंतर शिंदवणे येथे अचानक वॉल सोडल्याने पुन्हा सुरळीत चालू असणारी योजना बंद झाली. त्यानंतर ५ डिसेंबरला माळशिरस वितरिकेचे पाणी राजेवाडी वितरिकेला दिल्याने जादा पाणी झाल्याने दाब येऊन राजेवाडी वितरिका तुटली. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले पाणी १५ डिसेंबरपासून बंद झाले. वास्तविक पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुरुस्ती करणाºया विभागाने याकडे पूर्ण काणाडोळा केला. येथील शेतकºयांनी गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी, कांदा इत्यादी पिके घेतली. या पाण्याने भिजवलीदेखील, मात्र ही योजना बंद राहिल्याने रब्बी हंगामातील पिके जळून गेली.ही योजना सुरू झाल्यानंतर पाणी कधी मिळेल, अशी विचारणा आज जोर धरू लागली आहे. मात्र, ज्या शेतकºयांना पैसे भरून पाणी दिले गेले नाही त्या शेतकºयांना सध्या पाणी दिले जात आहे. आपल्याला पाणी मिळावे यासाठी शेतकरी अधिकाºयांकडे पैसे भरत आहेत. एकंदरीत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता ही योजना बंद राहणार नाही व बंद राहिली तरी शेतकºयांना परवडणार नाही, याची अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांनी काळजी घेणेगरजेचे आहे.