लोणावळा: केमीकल टँकर मधून केमिकल चोरी करणार्या तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडत केमिकल टँकरसह सुमारे २० लाखांचा मुद्देमाल गुरुवारी रात्री जप्त केला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरज गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
याप्रकरणी टँकर चालक गोरखनाथ फुलचंद जयस्वार (वय ५७ वर्षे रा. मुंबई), मुकेश विवेक सिंग (वय ४३ वर्षे रा. देहूरोड) व शिवकुमार शालीक साळुंखे (वय ३४ वर्षे रा. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरज पुलाच्या खाली अंधाराचा फायदा घेत केमीकल चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली. या आधारे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी ब्रीजच्या खाली टँकरमधून केमिकल चोरी करत असताना ३ जण आढळून आले. यात गाडीचा चालक हा स्वतः केमिकल चोरी करण्यामध्ये सहभागी होता.
सदर गुन्ह्यात एक टाटा कंपनीचा केमिकल टँकर, एक टाटा कंपनीची इंडीगो कार केमिकल चोरी करण्यासाठी लागणारे पाईप, प्लॅस्टीकचे बॅरल अस एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.