रांजणगाव सांडस :संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने खेडेगावातील लहान वस्तीत देखील शिरकाव केला आहे. मांडवगण फराटा गावातील एकवीस व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. पण इच्छाशक्ती, जिद्द, योग्य व्यायाम, सकस आहार यांच्या जोरावर कुटुंबातील वयोवृद्ध, लहान मुले सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात करून एकत्र कुटुंबाची एकी दाखवली आहे.
मांडवगण फराटा ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक जगताप यांच्या कुटुंबात लहानांपासून थोरांपर्यंत एकवीस व्यक्ती एकत्र राहत आहेत. शेतातील खरबुजाची विक्री करण्यासाठी अशोक हे सतत गावाबाहेर जात असत. त्यांचा व्यापारी, कामगार, ग्राहक यांच्याशी संपर्क येत होता. त्यामुळे त्यांना यातून कोरोनाची लागण झाली. बाहेरगावी गेल्याने त्यांनी घरी आल्यावर स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. परंतु काही दिवसांनी घरातील सर्व व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या. आई, वडील, चुलते, चुलती, भाऊ, भावजया, पुतणे, मुले आदी एकवीस व्यक्तींना कोरोना झाल्यावर त्यांनी न घाबरता परिस्थिती व्यवस्थित हाताळली.
घरातील वयोवृद्ध व्यक्तींनी संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, योग्य व्यायाम, सकस आहार यांच्या जोरावर सर्व कोरोनामुक्त झाले. घरातील अगदी सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. या जगताप कुटुंबाचा आदर्श घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींनी कोरोनाला लढा देऊन हरवले पाहिजे.
ऐंशीच्या घरातील आजोबांनी हरवले कोरोनाला
कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध ७८ वर्षांचे आजोबा व सर्वांत लहान सहा महिन्यांचा मुलगा त्यांनी कोरोनावरती मात केली आहे. तसेच, कुटुंबातील दहा व्यक्तींनी कोव्हीड सेंटर, ज्येष्ठ ६ लोकांनी वरदविनायक हॉस्पिटलमध्ये आणि ५ लोकांनी घरीच राहून उपचार घेतले.