पिंपरी : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या २० टक्के रक्कम देण्याच्या नावाखाली ठेवीदारांकडून मुळ ठेवीच्या पावत्या जमा केल्या जात आहेत. तसेच ८० टक्के रक्कम देण्याचे सर्वाधिकार पतसंस्थेकडे राहतील, असे संमतीपत्र लिहून घेवून खातेदार व ठेवीदारांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पतसंस्थेकडून राबविल्या जात असलेल्या या अन्यायकारक धोरणास रायसोनी पतफेढीच्या ठेविदारांच्या बैठकीत विरोध करण्यात आला.तसेच ठेविदारांना प्रथत: ५० टक्के रक्कम दिली जावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.बीएचआर पतसंस्थेद्वारा फसवणूक झालेल्या ठेवीदारांची बैठक राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी सारसबाग येथे पार पडली. यावेळी समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण दीक्षित, संघटक दामोदर दाभाडे, समन्वयक सचिन पार्टे, निलेश निकम, अनंत मोयनात, सुनील सोलंकी, ॠषिकेश भुंजे, हेमंत साबळे, भूपेश भयानी, विजय खोत, रविंद्र पावटेकर, महावीर बेदमुथा, रामदास मोकाशी, मनीषा दुग्गड आदी उपस्थित होते. बीएचआर पतसंस्थेकडून ठेवीदारांना प्रथत: २० टक्के रक्कम देण्यासाठी राबविली जात असलेली प्रक्रिया पारदर्शक नाही. ठेविची रक्कम देण्याच्या नावाखाली प्रत्येक ठेवीदाराकडून सक्तीने चुकीचे संमतीपत्र लिहून घेतले जात आहे; परंतु ठेवीदारांना ८० टक्के रक्कम देण्याचे सर्वाधिकार पतसंस्थेकडे असतील या चुकीच्या संमती पत्रावर एकाही ठेवीदाराने स्वाक्षरी करू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच संस्थेने प्रथत: ठेवीच्या ५० टक्के रक्कम द्यावी आणि उर्वरित रक्कम पुढील ४६ दिवस मुदतीने मिळण्याबाबतची पावती करून द्यावी, या मागणीवर ठाम राहणाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.ठाकरे म्हणाले, ठेवीदारांनी तथाकथित समितीच्या आवाहनाला बळी पडू नये. (प्रतिनिधी)
वीस टक्के रक्कम अमान्य
By admin | Published: November 17, 2014 5:14 AM