पुणे : बंदी असतानाही चारचाकी वाहनांना गडद रंगाच्या काचा (टिन्टेड ग्लास) लावणाऱ्या वाहनचालकांवर पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून गेल्या सहा महिन्यांत तब्बल २ कोटी ४२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर या काचा असणाऱ्या सुमारे २४ हजार २८४ वाहनांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांच्या पुढील व मागील काचा किमान तीस टक्के, तर बाजूच्या काचा पन्नास टक्के पारदर्शक असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर २०१५मध्ये पुन्हा ही कारवाई अधिक कडकपणे सुरुवात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याचे शहरात उल्लंघन सर्रासपणे होत असल्याचे आढळून येत असून, पोलिसांकडून नियमितपणे ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही काही वाहनधारक प्रकाशच आत येणार नाही व बाहेरून आतील काहीही दिसू शकणार नाही, अशा काचा लावत आहेत. तर, काही चालक व मालक गडद काचांऐवजी मूळ काचांवर गडद रंगाचे स्टिकर्स लावत आहेत. या वाहनांवर गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविली होती. त्यानुसार, जानेवारी ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सुमारे २४ हजर २८४ वाहनांवर कारवाई केली असून, २ कोटी ४२ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडून या वर्षी कोणतीही विशेष कारवाई हाती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात नियमित होणाऱ्या तपासणीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात काळ्या काचा वाहनांना लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाहनांची संख्या पाहता काचांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतल्यास वाहनांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काळ्या काचांसाठी अडीच कोटींचा दंड
By admin | Published: July 26, 2016 5:31 AM