पिंपरी : तळवडे येथील सॉफ्टवेअर पार्क चौकात महापालिकेने उभारलेल्या अग्निशामक केंद्राचे उद्घाटन एकाच दिवशी तासाभराच्या फरकाने चक्क दोन वेळा करण्यात आले. नागरिकांनी या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून, गटबाजीच्या प्रकारातून हे घडल्याचे निदर्शनास आले आहे.तळवडे औद्योगिक परिसर, तसेच सॉफ्टवेअर पार्क असा परिसर आहे. छोट्या-मोठ्या कंपन्या, तसेच सॉफ्टवेअर कंपन्या या भागात आहेत. शिवाय नागरी लोकवस्तीचा मोठा भाग आहे. त्यामुळे या भागात महापालिकेने जुन्या जकात नाक्याच्या जागेवर नव्याने अग्निशामक केंद्र सुरू केले. या केंद्राचा उद्घाटन समारंभ निश्चित झाला नव्हता. रविवारी सकाळी साडेआठला अ प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य व माजी आमदार विलास लांडेसमर्थक पंकज भालेकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ उरकण्यात आला. काही अवधी उलटण्यापूर्वीच तासाभरात आमदार महेश लांडे यांचे खंदे समर्थक मानले गेलेले नगरसेवक शांताराम भालेकर यांनी लगेच पुन्हा याच केंद्राचे उद्घाटन केले. दोघेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे; परंत भिन्न नेत्यांचे समर्थक असल्याने असे प्रकार घडू लागले आहेत. एकाच भागात झालेल्या कार्यक्रमासाठी त्याच परिसरातील एकाच पक्षाच्या सदस्यांमध्ये एकमत नसावे, याबद्दल नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.(प्रतिनिधी)
तळवडेतील अग्निशामक केंद्राचे दोनदा उद्घाटन
By admin | Published: April 04, 2016 1:15 AM