पुणे : चार वर्षांच्या जुळ्या मुलींना घेऊन निघालेल्या महिलेच्या दुचाकीला टॅंकरने धडक दिली. त्यामध्ये दोन्ही मुलींचा आईच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला ,तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले आणि अनेकांना राग अनावर होऊन त्यांनी टॅंकरचालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय ४) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. सतीशकुमार पुण्यात नोकरी करत होते. सोमवारी ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते. विश्रांतवाडी चौकातील सिग्नलला ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.